*** संवादिनी ***

( नमस्कार, आज अक्षय्यतृतीया. या आधी आपणाशी ‘ प्रभातपुष्प ‘ आणि ‘ विचारप्रभात ‘ या सदरातून संवाद साधत होतो. आजच्या शुभ मुहूर्तावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी ‘ संवादिनी ‘ हे छोटेखानी सदर सुरु करीत आहे. रोज नाही जमले तरी अधूनमधून आपल्या भेटीस येत जाईन. आपल्याला आवडेल ही अपेक्षा ! )

कल आज और कल

     हिंदीत काल आणि उद्यासाठी एकच शब्द आहे. तो म्हणजे ‘ कल ‘. मराठीत आपण काल आणि उद्या म्हणतो. हिंदी आणि अहिराणी बोलीत एक साम्य या बाबतीत मला आढळले. ते म्हणजे अहिराणी भाषेत बोलताना काही लोक उदयाला सुद्धा काल म्हणतात. बहुधा हा काल शब्द ‘ काळ ‘ वरून आला असावा. कालचा दिवस गेला तो भूतकाळ आणि उद्याचा येणारा दिवस तो भविष्यकाळ. आणि आजचा आपल्या हातात असलेला वर्तमानकाळ.
     लहानपणी मला कोणी एखादी चांगली गोष्ट करायला सांगितली की मी आईशी बोलताना म्हणत असे, ‘ मी उद्यापासून करीन. ‘ उदा. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, रोज नियमाने अभ्यास करणे, घरातील वडिलधाऱ्या मंडळीना नमस्कार करणे इ. पण आई म्हणायची, अरे वेड्या, उद्या कधी येत नसतो. म्हणून जे काही करायचे ते आजपासून कर. खरं म्हणजे तिचं ते बोलणं मला लहानपणी फारसं कळायचं नाही. मला वाटायचं असं कसं होईल ? आजच्या दिवसानंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे उद्या नाही का ? तो तर येणारच आहे ना !
     पण आईचे ते बोलणे मला पुढे कळायला लागले. आजच्या नंतरचा दिवस म्हणजे ‘ उद्या ‘ आपल्या हातात येतो सुद्धा. पण यावेळी एक जादू झालेली असते. आपल्या हातात तो पुढचा दिवस जेव्हा येतो तेव्हा त्याचे रुपांतर आजमध्ये झालेले असते. पुन्हा उद्याचा दिवस लांबच राहतो. तो आपल्या हाती लागतच नाही. म्हणूनच म्हटले जाते ‘ कल करे सो आज कर, और आज करे सो अभी कर.’ किती सार्थ असतात नाही या म्हणी ! जणू युगानुयुगांचा अनुभव या म्हणींच्या पाठीशी असतो ! म्हणून आपला उद्या चांगला हवा असेल तर त्याची पायाभरणी आपल्याला आजच करावी लागते.
-    विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
-    अक्षयतृतीया दि. १८/०४/२०१८

Comments