***** विचारप्रभात *****
‘ जीवन त्यांना कळले हो...’
परवा काही कामानिमित्त पुण्याला गेलो होतो.
त्यावेळी पुण्यात चतुरंग प्रतिष्ठानचे रंगसंमेलन सुरु होते. तेव्हा माझ्या
गोव्याच्या एक स्नेही सौ उर्मिला देसाई यांचा निरोप मिळाला की या वर्षी चतुरंगचा
कार्यक्रम पुण्यात आहे, तेव्हा जरूर या. चुकवू नका. आणि त्यांनी कार्यक्रम पत्रिका
पाठवली. मग मीही ठरवले की काही हरकत नाही. पुण्याचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढवला
आणि रंगसंमेलनाला हजर राहिलो. दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होते. कला, क्रीडा आणि
साहित्य रसिकांना मेजवानी होती. आणि चतुरंगचे सगळे कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी
होण्यासाठी मनापासून झटत होते. मी तर हे सगळे कार्यक्रम पाहून भरून पावलो. आणि
चाळीसगावला परतताना जणू एक नवीन उर्जा सोबत घेऊन आलो. एका चांगल्या कार्यक्रमाला
हजर राहिल्याचा आनंद मला झाला. पण या सगळ्या कार्यक्रमांबद्दल कधी तरी लिहीन.
या कार्यक्रमात मला दोन ज्ञानमहर्षी भेटले.
त्यापैकी एक डॉ रघुनाथ माशेलकर. आणि दुसरे डॉ गो बं देगलूरकर. एक विज्ञानमहर्षी
आणि दुसरे ज्ञानमहर्षी. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी तपश्चर्या करून ज्ञान संपादन
करीत असत. त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करीत असत. ऋषीमुनी तर आपण पाहिले
नाहीत पण डॉ माशेलकर आणि डॉ देगलूरकर यांच्यासारख्या व्यक्ती आजच्या काळातील
महर्षीच आहेत अशी माझी भावना आहे. डॉ माशेलकर यांच्याबद्दल मी कधीतरी लिहीन. आज
मला प्रामुख्याने सांगायचे आहे ते डॉ गो बं देगलूरकर यांच्याबद्दल.
डॉ देगलूरकर यांचे नाव मी फक्त ऐकले होते.
त्यांना कधी पाहण्याचा वा ऐकण्याचा योग आला नव्हता. किंवा त्यांचे कार्यही मला
फारसे माहिती नव्हते. पण चतुरंगमुळे तो योग आला. नृत्यस्वरूप गीतरामायणचा एक सुंदर
कार्यक्रम पाहिल्यानंतर काही मिनिटांचा वेळ पुढील कार्यक्रम सुरु होण्यासाठी होता.
आम्ही प्रवेशद्वाराजवळ थांबलो होतो. त्यावेळी डॉ देगलूरकर यांना पाहण्याचा योग
आला. शुभ्र धोतर, शुभ्र पांढरा कुर्ता, कपाळावर गंध, वयोवृद्ध आणि काहीसे थकलेले
असे ते प्रवेशद्वाराजवळ उभे होते. पण चेहऱ्यावर असलेले ज्ञानाचे तेज काही लपत
नव्हते. त्यांना ओळखणारी मंडळी तेथेच त्यांना वाकून आदराने नमस्कार करीत होती.
मग कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे होते सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील. सोबतच पुण्याच्या महापौर
मुक्ता टिळक, डॉ विनय सहस्रबुद्धे, डॉ अरविंद जामखेडकर, डॉ सागर देशपांडे आधी
मंडळी व्यासपीठावर हजर होती. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते डॉ
देगलूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा गुणगौरव करणारी
मान्यवरांची भाषणे झाली. आता मला हळूहळू डॉ देगलूरकर यांच्या महानतेची कल्पना येऊ
लागली होती. पण तरीही माझ्या मनात उत्सुकता होती ती डॉ देगलूरकरांना ऐकण्याची. बोलण्यातून,
भाषणातून व्यक्ती कळते असे म्हणतात ना!
आणि सत्काराला उत्तर देण्यासाठी डॉक्टर उभे
राहिले. यावेळी त्यांचे वय होते अवघे ८५ वर्षांचे. पण त्यांच्या नर्मविनोदी
भाषणाने काही क्षणातच श्रोत्यांची मने जिंकून घेतली. त्यांच्या भाषणात आधीचे वक्ते
काय बोलले याचा समाचार त्यांनी घेतलाच. काहीही न विसरता. नंतर त्यांना जे मानपत्र
देण्यात आले होते त्याबद्दल ते गमतीने बोलले. अर्थातच त्यातून त्यांची नम्रता,
मोठेपणा प्रतीत होतो. ते म्हणाले, ‘ या मानपत्रात जे काही गुण माझ्या अंगी
असल्याचे सांगण्यात आले ते बहुधा मी अंगी बाणवावेत म्हणून ही योजना असावी. अन्यथा
मी त्यासाठी पात्र नाही.’
डॉ देगलूरकर यांनी आपले सारे आयुष्य
मुर्तीशास्त्र, नाणकशास्त्र, मंदिरस्थापत्य इ. च्या संशोधनात घालवले. त्या
कार्यामध्ये आपल्या संशोधनाचा स्वतंत्र ठसा उमटवला. या विषयातील अनेक राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सन्मान झाला. ‘ डेक्कन कॉलेज ‘ या नामवंत
संस्थेचे ते पहिले कुलपती. दोन वेळा डी लिट ही सन्मान्य पदवी प्राप्त केली.
मराठवाड्याच्या सांस्कृतिक इतिहासावर पहिली पीएचडी त्यांचीच. मराठवाडा हा दुष्काळी
भाग असेल पण मराठवाड्याचा सांस्कृतिक इतिहास आपल्या संशोधन कार्याने त्यांनी
समृद्ध केला. सांस्कृतिक दुष्काळ दूर केला. लॉस एंजेलिसमध्ये मुर्तीशास्त्रावर
भाषण करणारे ते पहिले भारतीय. ते म्हणतात, ‘ आपल्याकडे हिंदू धर्मात तेहेतीस कोटी
देव आहेत म्हणून हिंदू धर्माला इंग्रजांनी नावे ठेवली. त्यांना कळले नाही पण
आपल्याला तर कळायला हवे होते ना. तेहेतीस कोटी म्हणजे तेहेतीस प्रकारचे. यातील
कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. ‘मंदिरात गेल्यावर तुम्ही जेव्हा मूर्तीकडे
पाहता तेव्हा लक्षात येतं की, अरे ही मूर्ती माझ्यासारखीच आहे. दोन डोळे, हात, कान,
नाक, पाय सगळं माझ्यासारखाच आहे. ‘ सोहं ‘ इथं तुम्हाला ज्ञान होतं की, मी तेच
आहे, ते म्हणजे ब्रह्म. ‘
मंदिरात गेल्यानंतर देवाची मूर्ती आपण
पाहतो. नमस्कार करतो. पण या मूर्तीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली ती डॉ देगलूरकर
यांनी. श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील योगशास्त्र, वेरुळच्या लेण्यातील मर्म,
मंदिरातील सुरसुन्दरीचे गूढ आदींकडे पाहण्याची नवीन दृष्टी त्यांनी
अभ्यासकांबरोबरच जनसामान्यांनासुद्धा प्रदान केली. या संदर्भात मराठी-इंग्रजी
भाषांमधून लेखन, व्याख्याने, विविध संस्कृतींचा अभ्यास, उत्खनन, पुरातत्व संग्र्हलायाना
भेटी हे सगळे करीत असताना वयाची पंच्याऐशी वर्षे त्यांनी गाठ्लीत आणि अजूनही हे
कार्य अव्याहतपणे सुरु आहे. त्यांची त्यामागची तळमळ, निखळ ज्ञाननिष्ठ आणि
कार्यशक्ती विलक्षण आहे. त्यातून त्यांनी अनेकांना उर्जा दिली आणि देत आहेत. धुंडामहाराज
देगलूरकर यांच्यासारख्या श्रेठ वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणाऱ्या घराण्यात
त्यांचा जन्म झाला आणि त्यांचीच परंपरा पण वेगळ्या अर्थाने डॉ देगलूरकर यांनी पुढे
चालवली. या पुरस्काराला उत्तर देताना त्यांचे शब्द होते, ‘ आता या दिव्यातील तेल
संपत आले आहे. पण वात जळते आहे. पण या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने थोडेसे
तेल या दिव्यात पडले आहे. त्याचा वापर मी माझ्या अपूर्ण राहिलेल्या कार्यासाठी
निश्चितपणे करीन याची ग्वाही तुम्हाला देतो. मी तसा आयुष्यभर विद्यार्थीच राहिलो
आहे. काही मोठेपण असलेच ते माझ्या गुरूंचे, आईवडिलांचे आणि पूर्वसुरींचे आहे.
‘ अशा वेळी मला कविवर्य बा.भ बोरकरांच्या
ओळी आठवतात,
जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो.
अशा या ज्ञानतपस्वीला वंदन
आणि दीर्घआयुष्य लाभो ही प्रार्थना !
-
- विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/१२/२०१७
Comments
Post a Comment