***** विचारप्रभात *****

‘ देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती...’

चतुरंग रंगसंमेलनात पुणे येथे दोन ऋषितुल्य व्यक्तीमत्वांचा गौरव करण्यात आला. त्यातील पहिले होते डॉ रघुनाथ माशेलकर आणि दुसरे व्यक्तिमत्व होते डॉ गो बं देगलुरकर यांचे. पहिल्या दिवशी डॉ रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत घेण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी डॉ देगलूरकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एक विज्ञानमहर्षी तर दुसरे ज्ञानमहर्षी. डॉ माशेलकर आज ७५ वर्षांचे आहेत तर डॉ देगलूरकर ८५ वर्षांचे. दोघेही आपापल्या क्षेत्रात आजही कार्यरत आहेत. दोघांचीही स्मरणशक्ती उत्तम आहे. आपल्या ध्येयाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत असणाऱ्या माणसांना परमेश्वर कसे बळ देतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही दोन व्यक्तिमत्वे. कालच्या लेखात मी डॉ देगलूरकर यांचा परिचय करून दिला होता. आज मी डॉ रघुनाथ माशेलकर यांच्याबद्दल बोलणार आहे.

उंच आणि सडपातळ शरीरयष्टी, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले डॉ रघुनाथ माशेलकर जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा साऱ्यांनीच या ज्ञानमहर्षींचे टाळ्या वाजवून स्वागत केले. ‘ जडणघडण ‘ या मासिकाचे संपादक असलेले डॉ सागर देशपांडे यांनी डॉ माशेलकरांची मुलाखत घेतली. खरे म्हणजे डॉ ना त्यांनी बोलते केले. त्यांनी फक्त मोजकेच प्रश्न विचारले आणि डॉ माशेलकर भरभरून बोलत राहिले. आणि त्यांच्या बोलण्यातून ते त्यांचे बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडत गेले.

डॉ माशेलकरांचा जन्म गोव्यातील माशेल या गावाचा. त्यांच्या पित्याचे छत्र बालपणीच हरपले. त्यांचे बालपण मुंबईत गेले. मुंबईतल्या पालिकेच्या शाळातील शिक्षकांनी त्यांचे आयुष्य घडवलं. पहिला गुरु आई. आईने मोठ्या कष्टाने त्यांना वाढवले. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. खाण्यासाठी, शिक्षणासाठी पैसे नव्हते. चांगले कपडेलत्ते म्हणजे त्यांच्या दृष्टीने चैनच होती. त्यांनी शिकावे म्हणून त्यांची शिवणकाम किंवा मिळेल ते काम करायची. एकदा त्यांच्या आईला कळले की गिरगावातल्या कॉंग्रेस भवनात काही काम मिळण्याची शक्यता आहे. त्या तिथे गेल्या. तिथे दिवसभर उभ्या राहिल्या. नंतर त्यांना कळले की या कामासाठी तिसरी पास असण्याची आवश्यकता आहे. त्याचं तेवढं शिक्षण नव्हतं. कदाचित खोटे बोलून त्यांना ती नोकरी मिळू शकली असती. पण त्या माउलीनं खोटं बोलण्यापेक्षा परत जाण पसंत केलं. पण त्याचवेळी तिनं आपल्या मनाशी ठरवलं की माझ्या लाडक्या रघुला मी खूप शिकवून मोठं करीन. त्याला जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन. आणि हा निर्धार पूर्ण करण्यासाठी तिने प्रचंड कष्ट घेतले.

आपल्या आईची आठवण सांगताना हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रसायन शास्त्रज्ञ भावूक झाला होता. ते म्हणाले की मी पुढे जेव्हा प्राध्यापक म्हणून काम करू लागलो तेव्हा मी कुठेही बाहेर जायचे असले की आईला खर्चासाठी काही पैसे टाकून जात असे. तिने कधी मागितले नाहीत पण मी देत गेलो. मी नंतर कधी विचारलेही नाही की तिने त्या पैशांचे काय केले. पुढे आईच्या निधनानंतर जेव्हा तिचे कपाट उघडले गेले तेव्हा तिने त्यात आपल्याला मिळालेले सगळे पैसे ठेवल्याचे आढळून आले. त्यात एक चिट्ठी लिहून ठेवली होती. ‘ जे पैसे तू मला दिले होतेस, त्याची मला आवश्यकता नव्हती. ते सर्व पैसे मी जपून ठेवले आहेत. ते पैसे आता गरीब मुलांसाठी खर्च कर. त्यांना शिक्षणासाठी मदत कर.’ त्यातून मग पुढे डॉ माशेलकरांनी आपल्या आईच्या नावाने फंड उभा केला. आणि त्यातून होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली जाते आहे.

डॉ माशेलकर आपल्या शिक्षकांबद्दल खूप आदराने बोलले. महापालिकेच्या शाळेत ते शिकले. त्या काळातील ध्येयवादी शिक्षकांनी त्यांना मनापासून शिकवले. त्यांना शाळेत विज्ञान शिकवायला भावे सर होते. त्यांना त्या वेळी अभ्यासात साबण कसा तयार करतात याविषयी धडा होता. तो पाठ करून परीक्षेत माहिती लिहिली तर परीक्षेत पूर्ण गुण मिळणे शक्य होते. पण भावे सर त्यांना एका साबण कारखान्यात घेऊन गेले तेथे त्यांनी प्रत्यक्ष साबण बनवण्याची प्रक्रिया मुलांना दाखवली. केवळ वर्गात पाठ्यपुस्तकातला धडा शिकवणे एवढ्यापुरते त्यांच्या शिक्षकांचे शिकवणे कधीच नव्हते. एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवत असताना भावे सर त्यांना बाहेर उन्हात घेऊन गेले. भिंग खालीवर करून कागदावर एक बिंदू मिळवला. त्यावर सूर्यकिरणे एकवटली आणि कागद जळायला सुरुवात झाली. तेव्हा त्यांनी आपल्या आवडत्या आणि बुद्धिमान विद्यार्थ्याला म्हणजेच रघुनाथला म्हटले, ‘ पाहिलेस रघुनाथ..? सूर्यकिरणे एकवटली की त्या शक्तीच्या एकत्रीकरणाने कागद सुद्धा जाळू लागतो. या करिता समांतर जाणारी सूर्यकिरणांची शक्ती आपल्याला एकत्र करावी लागते. ‘ असेच जीवनात सुद्धा घडते. इतरत्र वाया जाणारी आपली शक्ती आपण एकवटली तर आपणही जीवनात मोठे काम करू शकतो. जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्लीच जणू डॉ माशेलकरांना आपल्या शिक्षकांकडून मिळाली होती. आणि भविष्यात त्यांच्या रूपाने भारताला एक भावी वैज्ञानिक मिळाला होता.

याच गुरुकिल्लीचा वापर डॉ माशेलकर जेव्हा CSIR ( Centre for Scientific and Industrial Research ) चे प्रमुख झाले तेव्हा त्यांनी केला. या वेळी CSIR मध्ये २८००० लोक कार्यरत होते. देशभर प्रयोगशाळा विखुरल्या होत्या. परंतु त्यांच्यात एकसूत्रता नव्हती. या देशभरातील जवळपास चाळीस प्रयोगशाळांचं समांतर चालणं थांबवून त्यांना डॉ माशेलकरांनी एका ध्येयाने प्रेरित केले आणि विशिष्ट सूत्रात त्यांची बांधणी केली. त्यासाठी व्हिजन नावाची योजना आखली. आणि मग त्यातून निर्माण झालं भारतीय संशोधनाचं एक विराट पर्व !

अकरावीच्या परीक्षेत त्यावेळी डॉ माशेलकर बोर्डाच्या मेरीटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे शिकायचे नाही असे ठरवले. पण आईच्या आग्रहामुळे बी केम ला प्रवेश घेतला. १९६९ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आणि सदैव प्रेरणा देणारे असे प्रा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन करून पी एच डी पदवी प्राप्त केली. युरोपमधील सॅलफोर्ड विद्यापीठात ( लंडन ) येथे व्याख्याता म्हणून काम केले. पुढे डेन्मार्क मधील एका विद्यापीठात व्याख्याता म्हणून ते राहिले. यानंतर ते अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात प्राध्यापक झाले. अशाच वेळी त्यांना पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL ) मध्ये संचालक म्हणून कार्य करण्याची संधी लाभली आणि ते तत्काळ भारतात परतले. या ठिकाणी संचालक म्हणून काम करताना डॉ माशेलकरांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले.

आपल्या आयुष्यातील कमीतकमी १२ वर्षे तरी अनवाणी पायांनी चालणारा आणि सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस आपल्या ध्येयासक्तीमुळे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा रसायनशास्त्रज्ञ बनला. आणि पुढे इंग्लंडमध्ये प्रख्यात शास्रज्ञ न्यूटनने जिथे सही केली आहे अशा पुस्तकात सही करण्याचा मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला. डॉ माशेलकरांनी पुढे अमेरिकेशी बौद्धिक आणि न्यायालयीन लढा देऊन भारतात पूर्वापार चालत आलेले हळदीचे गुणधर्म आणि त्याचा वापर करण्याचे पेटंट घेण्यापासून अमेरिकेला रोखले. अशाच पद्धतीने कडुलिंबाचे आणि बासमती तांदळाचे पेटंटही त्यांनी भारताला परत मिळवून दिले. यातून दोन फायदे झाले. आपल्या पारंपारिक ज्ञानाचे महत्व आपल्याला आणि साऱ्या जगाला कळले. आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडा मिळाला. ते म्हणतात, ‘ बिनतारी यंत्रणेचा म्हणजेच वायरलेसचा शोध आपले भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी लावला. पण त्या शोधाचे श्रेय मात्र मार्कोनीला मिळाले. कारण बोस यांनी आपल्या संशोधांचे पेटंट घेतले नव्हते. १८९८ मध्ये बोस यांनी वायरलेसचा शोध लावला होता.’ या बाबतीत ‘ ज्ञान ही संपत्ती आहे आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होते, म्हणून ते ज्ञान आणि संशोधन सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ‘ ही त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे.

भारताच्या प्रचंड लोकसंख्येबद्दल नेहमी चिंता व्यक्त केली जाते. पण याकडे पाहण्याचा डॉ माशेलकरांचा दृष्टीकोन वेगळा आहे. ते म्हणतात, ‘ भारताची लोकसंख्या हा एक खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणस जास्त तेवढा कल्पकतेला वाव ! भारत हा तरुणांचा देश आहे. हे तरुण अनेक नवनवीन धडाडीची कामे करून देशाला प्रगतीपथावर नेतील. ‘

त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. फेलो ऑफ रॉयल सोसायटी सह अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने ते सन्मानित आहेत. पन्नासहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. असे असूनही अत्यंत साधे, प्रेमळ आणि निगर्वी व्यक्तिमत्व असलेला हा माणूस खरोखर ऋषितुल्य आहे. सकारात्मक उर्जा अनुभवायची असेल तर डॉ माशेलकर यांच्यासोबत काही काळ व्यतीत करा. ते शक्य नसेल तर जिथे शक्य आहे तिथे त्यांचे भाषण ऐकायला जरूर जा. ते ही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले लेख वाचा. मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी आयुष्यात यशस्वी झालो असे ठामपणे सांगणारे माशेलकर एक दीपस्तंभ आहेत. मिळेल तेवढी उर्जा आणि प्रकाश त्यांच्याकडून आपण घेतला पाहिजे.

- विश्वास देशपांडे, चाळीसगाव.



- २६/१२/२०१७

Comments

Popular posts from this blog