****** विचारप्रभात *****
‘ थोडा है थोडे की जरुरत है ‘
     आज आपण सगळ्यांचे अभिनंदन करण्याची पहिली संधी मी घेतो. अभिनंदन यासाठी की माझ्यासह आपणा सर्वांनी नवीन वर्षात पदार्पण केले आहे. खरे तर तुम्ही म्हणाल की यात अभिनंदन करण्यासारखे असे काय आहे ? तसे नवीन वर्षात पदार्पण करायला काहीच करावे लागत नाही. आपण काही करायचे नाही ठरवले तरी आपले नवीन पदार्पण नवीन वर्षात होतेच नाही का ? खरे आहे तुमचे म्हणणे ! पण मित्रहो, अभिनंदन या साठी की आपण सगळे लकी आहोत, सुदैवी आहोत. आपल्याला ही नवीन वर्षाची सकाळ बघायला मिळाली आहे. कालपरवा कमला मिल मध्ये झालेले अग्नितांडव  आठवा. त्यात जी मंडळी आपले प्राण गमावून बसली ती कालपरवापर्यंत आपल्यात होती ना ! दररोज रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु आहे. त्यात ज्यांनी जीव गमावला तेही कालपर्यंत आपल्यासोबत होतेच ना ! म्हणून मी आपल्याला सुदैवी म्हणतो, लकी म्हणतो. आपले अभिनंदनही मी त्यासाठीच केले.
     काल ३१ डिसेंबर अनेकांनी अनेक पद्धतीने साजरा केला. ज्याला जसे जमले तसा. कोणी पर्यटनासाठी बाहेर पडले. निसर्गरम्य ठिकाणी गेले. अनेकांनी हॉटेल्समध्ये ‘ आगावू ‘ ( हा शब्द आधीच किंवा वेळेपूर्वीच या  अर्थाने वापरला आहे ) आरक्षण करून तेथे हा दिवस साजरा करण्यात धन्यता मानली. काही मंडळीनी ( सॉरी, चुकलो. बहुतेकांनी ) आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला. तर कोणी खाणे आणि ‘ पिणे ‘ यात स्वतःला बुडवून घेतले. अनेकजण तर अशा पद्धतीने वागताना दिसले की जणू येणाऱ्या वर्षभरात यांना काही ‘ खातापिता ‘ येणार नाही. मोबाईलवर तर शुभेच्छांचा पूर आला होता. सगळेजण खूपच उदार आणि नम्र झालेले आढळून आले. ‘ मैत्रीबद्द्दल धन्यवाद, काही चुकले असल्यास मोठ्या मानाने क्षमा करावी, नवीन वर्षात आपली मैत्री कायम राहावी. ‘ असले उदात्त आणि भावपूर्ण संदेश सगळ्यांच्या भ्रमणध्वनीवर आले. अर्थात त्यातील तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी संदेश पाठवले त्यात खरेपणाची प्रामाणिक भावना होती. तर काहींनी औपचारिकता म्हणूनही आलेले संदेश कॉपी पेस्ट करून पुढे पाठवण्याचे महान कार्य पार पडले. त्यांच्या या महान कार्यामुळे आता भ्रमणध्वनीवरील आलेले मेसेज डिलीट करण्याचे या पुढील आणखी महत्वाचे कार्य तुम्हाआम्हाला पार पाडावे लागणार आहे असो.
     आपण असे समजायला हरकत नाही की या शुभेच्छांच्या पडलेल्या पावसामुळे येणारे नवीन वर्ष खरोखरी आपल्याला चांगले जाणार आहे. खरोखरी जाईलही तसे. कारण शुभेच्छा, आशीर्वाद यामध्येही एक प्रकारची शक्ती असते म्हणूनच आपण ते घेत असतो किंवा देत असतो. पण मंडळी, शुभेच्छा किंवा आशीर्वाद द्यायला किंवा घ्यायला फार काही कष्ट पडत नाहीत. म्हणून खरोखरीच नवीन वर्ष चांगले जावे असे वाटत असेल तर मनाशी काही संकल्प करण्याचा दिवस आजचा आहे हे मला सांगायचे आहे.
     या १२ तारखेला स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. त्यांच्या बद्दलचे एक पुस्तक वाचत असताना मला त्यांनी हरिपद मिश्र यांना नोकरीच्या संदर्भात दिलेला सल्ला मला वाचायला मिळाला. तो मी आपणाबरोबर शेअर करतो आहे. हरिपद मिश्र एका चांगल्या पदावर आणि चांगल्या पगाराची नोकरी करीत असत. पण वरिष्ठांचे आणि त्यांचे नाना कारणांनी पटत नसे. त्यांनी एवढेसे काही म्हटले तर मिश्र चिडत. एवढी सोन्यासारखी नोकरी मिळूनही त्यात सुख कसे ते नव्हतेच. ही सगळी कर्मकहाणी एक दिवस मिश्र यांनी स्वामी विवेकानंदाना सांगितली. ती ऐकून त्यांना स्वामीजींनी जे उत्तर दिले ते मला खूप आवडले. ते आपणा सगळ्यांसाठी देत आहे. स्वामीजी म्हणाले, “ तुम्ही नोकरी करता ती कशासाठी ? पगारासाठीच ना ? मग महिन्याकाठी नित्यनियमित पगार मिळत असता फुकट मनस्ताप कशाला करून घेता ? बरे, तुम्हाला वाटल्यास तुम्ही नोकरी खुशाल सोडून देवू शकता. तुम्हाला नोकरी करा म्हणून काही कुणी जबरदस्ती करीत नाही. मग उगाच, ‘ काय ही गुलामगिरी, फुकट या कटकटीत पडलो ‘ म्हणून सारखे रडगाणे गाऊन या दु:खभरल्या संसारात आणखी दुःख वाढवीत बसण्याचे प्रयोजन काय ? दुसरे असे की ज्या तुमच्या कामाबद्दल तुम्हाला पगार मिळतो त्या कामाव्यतिरिक्त, तुमचे अधिकारी संतुष्ट राहावे यासाठी कधी काही केल्याचे तुम्हाला आठवते ? असा प्रयत्न तर आपण कधीच केलेला नसतो आणि वर फिरून आपणच ते आपल्यावर संतुष्ट नाहीत म्हणून चिडचिड करतो ! याला काय म्हणावे ? पक्के लक्षात असू द्या की दुसऱ्यांबद्दल जो भाव आपल्या मनात असतो तोच आपल्या कामातून प्रकट होत असतो.
     आजपासून ही दुसऱ्यातील वाईट पाहण्याची, दोष काढण्याची दृष्टी अजिबात टाकून द्या. हे जसजसे तुम्हाला साधेल तसतसे तुम्हाला आढळून येईल की त्यांच्या तुमच्या बद्दलच्या भावना व त्यांची तुमच्याशी वर्तणूक यात बदल झालेला आहे. “ हे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तितकेच उपयुक्त आहेत.
     नवीन वर्षानिमित्त काही स्वप्ने आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात तरळत असतील. उद्याच्या आशा असतील. खरे तर माणूस आशेवरच जगत असतो. तुम्ही आपल्या मनाशी काही संकल्प निश्चित केले असतील. त्या संकल्पांना, आशांना, इच्छांना प्रयत्नांची जोड द्या. तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत ही सदिच्छा. फक्त नवीन वर्षानिमित्त त्या संकल्पात, इच्छा ,आकांक्षामध्ये एक छोटीशी इच्छा मनात कुठेतरी असू द्या की मी माझ्या जीवनात यश येण्यासाठी, चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्न तर करणारच आहे. पण ते करताना समाजातील काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर मला हास्य फुलवता येईल का ? कारण जे आपण देतो ते शतपटीने आपल्याला परत मिळतो. तो आनंद, ते हास्य आपल्याला शतपटीने परत मिळेल. माझ्या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर, समाजातील गरीब आणि गरजू माणसांच्या चेहऱ्यावर, कुणाची तरी प्रतीक्षा करणाऱ्या वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्याची एखादी स्मितरेषा तरी मला उमटवता येईल का ? त्यासाठी पैसाच पाहिजे असे काही नाही. आपण आपला वेळ, श्रम आणि गोड बोलण्यातून सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो, खुलवू शकतो. थोडा है थोडे की जरुरत है..जिंदगी फिर भी यहां खुबसुरत है...राज कपूरच्या सिनेमातील एका गीताने मी आपला निरोप घेतो...
     किसी के मुस्कुराहटोपें हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, जिना इसी का नाम है...
-    विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
-    १/१/२०१८

Comments

Popular posts from this blog