***** विचारप्रभात *****
चतुरंग प्रतिष्ठान - एक सांस्कृतिक चळवळ 

      पुण्यात काही कामानिमित्त गेलो असताना चतुरंग प्रतिष्ठानचे रंगसंमेलन पुण्यात असल्याचे समजले. त्यावेळी योगायोगाने पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव सुरु होता. मला गोव्याच्या सौ उर्मिला देसाई यांच्याकडून या संमेलनाला येण्याबद्दलचे आमंत्रण मिळाले. आणि मी या संमेलनासाठी थांबण्याचे ठरवले. दि. १६ आणि १७ डिसेंबर या दिवशी हे रंगसंमेलन होणार होते.
     यापूर्वी चतुरंगची पाच संमेलने मुंबईत, ३ गोव्यात, एक आनंदवनात आणि एक चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या वर्षी चतुरंगने जाणीवपूर्वक हे संमेलन पुण्यात घ्यायचे ठरवले. या संमेलनाची जबाबदारी जाणीवपूर्वक चतुरंगच्या तरुण कार्यकर्त्यांवर टाकण्यात आली, त्याचे कारण म्हणजे नव्या पिढीच्या विचारांना चालना मिळावी, त्यांच्या कार्याला नवकल्पनांचे धुमारे फुटावे. ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक पेलली. नुसती पेललीच नव्हे तर कमालीची यशस्वी करून दाखवली.
     पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंडळ या ठिकाणी हे रंगसंमेलन आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशी दुपारी चार  ते दहा अशी वेळ ठेवली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचताच दिसली ती कार्यकर्त्यांची लगबग. सगळे कार्यकर्ते एका विशिष्ट रंगाच्या पोशाखात आलेले होते. स्त्री आणि पुरुष कार्यकर्ते आपापल्या जागी आपल्याला नेमून दिलेली कामे करीत होते. येणाऱ्या जाणाऱ्याचे हसतमुखाने स्वागत करीत होते. त्यांना मार्गदर्शन करीत होते. काही कार्यकर्ते श्रोत्यांना त्यांच्या जागी बसण्यास मदत करीत होते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या पदावर काम करणारे कार्यकर्ते सगळे काही विसरून चतुरंगच्या कामासाठी एकत्र आले होते. त्यावेळी दिसला तो त्यांच्यातील फक्त सेवाभावी कार्यकर्ता. अशी निरपेक्षपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी चतुरंगकडे आहे ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे.
     पुण्यात या कालावधीत सवाई गंधर्व महोत्सव सुरु असल्याने या कार्यक्रमाला कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका होती. पण तेथील रसिकांची उपस्थिती पाहून माझी शंका व्यर्थ ठरली. पुणेकरांनी या रंगसंमेलनाला उत्तम प्रतिसाद दिला. आणि दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात पं कद्री गोपालनाथ आणि पं रोणू मुजुमदार यांच्या सॅक्सोफोन - बासरी जुगलबंदीने झाली. त्यांनी आपल्या वादनाने रसिकांची मने जिंकली. या नंतर या कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन झाले.
     हे उद्घाटन खरेच आगळेवेगळे होते. हे २७ वे रंगसंमेलन असल्याने पुण्यातील २७ मान्यवर व्यक्ती व कलाकारांना बोलावण्यात आले होते. २७ नक्षत्रेच जणू ! विशेष म्हणजे या वेळी या व्यक्ती श्रोत्यांच्या रांगेतून पाठीमागून आल्या व रंगमंचाकडे चालत गेल्या. यात होते प्रसिध्द अभिनेते दिलीप प्रभावळकर, आशा काळे-नाईक,रोहिणी हट्टंगडी, मोहन जोशी, रवींद्र साठे, सुहास बहुळकर, सुधीर गाडगीळ, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, मुग्धा गोडबोले, योगेश सोमण, मिलिंद फाटक, शर्वरी जमेनीस आदींचा समावेश होता. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता सुनील बर्वे याने केले.
     या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सोहळा अगदी आखीवरेखीव होता. प्रत्येकाची बसण्याची जागा ठरलेली होती. नटराज पूजनानंतर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमानंतर चहापान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला आलेले रसिक आणि उपस्थित सर्व मान्यवर यांचे एकत्रित चहापान झाले. त्यामुळे रसिकांना हा सोहळा आपला वाटला. या रंगसंमेलनात नवरंगाबरोबरच हा एकतेचा दहावा रंग होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावेळी प्रसिध्द व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी श्रोत्यांसमोर सहजपणे खेळीमेळीच्या वातावरणात प्रसिध्द व्यक्तींची व्यंगचित्रे रेखाटून श्रोत्यांकडून वाहवा मिळवली.
     मग पुन्हा रंगसंमेलनाच्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम झाले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेले. शिक्षणाचे डोही आनंद तरंग या अंतर्गत डॉ रघुनाथ माशेलकरांची अत्यंत प्रेरणादायी मुलाखत झाली. डॉ सागर देशपांडे यांनी ती घेतली. शेवटी डॉ गिरीश ओक आणि इला भाटे यांच्या नाट्याभिनयाने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रोते दुसऱ्या मनोमन दुसऱ्या दिवशी येण्याचे ठरवून घरी गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी कार्यक्रम ३ वाजताच सुरु झाला. या कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे यांनी सादर केलेल्या नृत्यस्वरूप गीतरामायणाने झाली. या कार्यक्रमाने श्रोत्यांना निखळ आणि उच्च प्रतीचा आनंद दिला. कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यांनी उभे राहून या सर्व कलाकारांना मानवंदना दिली.
     या नंतर या रंगसंमेलानाचे मुख्य आकर्षण असलेला कार्यक्रम झाला. तो म्हणजे जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा. हा पुरस्कार विश्वविख्यात मूर्तीशास्त्रज्ञ व मंदिर स्थापत्य तज्ञ डॉ गो बं देगलूरकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सौ मुक्ता टिळक, डॉ विनय सहस्रबुध्दे, डॉ अरविंद जामखेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्य्क्रमानातर ' बापमाणूस ' या येणाऱ्या चित्रपटाच्या निमित्त्ताने नाना पाटेकर, सतीश राजवाडे, सुमित राघवन, इरावती हर्षे यांची मुलाखत प्रसिध्द मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतली. या सर्व कलाकारांनी श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला. रंगसंमेलनाच्या कार्यक्रमाची सांगता ' स्वरब्रह्म ' या गायन मैफलीने झाली. यात आनंद भाटे आणि सौ मंजुषा कुलकर्णी-पाटील यांनी आपले दर्जेदार गायन सदर करून रसिकांचे कान तृप्त केले.
     चतुरंग प्रतिष्ठान कोकणात इ. १०- १२ वी च्या मुलांसाठी मार्गदर्शन करून त्यांना त्यांचा परीक्षेतील सहभाग अधिक सुधारण्यासाठी मदत करते. शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करते अशीही माहिती मला मिळाली. चतुरंगच्या आजपर्यंतच्या कार्यक्रमात अनेक प्रथितयश चित्रपट कलाकारांनी सहभाग दिला आहे. विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर या संस्थेशी कायमचे जोडले गेले आहे. चतुरंग म्हणजे जणू या सगळ्यांचे एक कुटुंब बनले आहे. एकूण काय तर चतुरंग ही केवळ एक संस्था न राहता एक सांस्कृतिक चळवळ बनली आहे. पुढील वाटचालीसाठी चतुरंगला हार्दिक शुभेच्छा !
                                                 - विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
                                                    

Comments

Popular posts from this blog