मरावे परी कीर्तिरूपे उरावे...! 

      काल संध्याकाळी फिरायला गेलो असताना नेहमीप्रमाणे काही ओळखीची मंडळी भेटली. त्यातीलच एक बापू. वयोवृद्ध. वय साधारण ७०-७२ वर्षे असेल. पण चालणे तरुणाला लाजवेल असे. आम्ही बसलो आणि गप्पा सुरु झाल्या. आणि कशावरून तरी बापू एकदम गंभीर झाले. म्हणाले, ” सर परमेश्वराला माझी एकच प्रार्थना आहे.मी हा असा चालताबोलता आहे तोवरच त्याने मला न्यावे, मग आज असो की दहा वर्षांनी. पण अंथरुणावर पडणे नको. “ मी म्हटले, “ बापू, तुमचे बरोबरच आहे. प्रत्येकाचीच तशी इच्छा असते. आजारी होऊन, अंथरुणाला खिळून मरण यावे असे कोणाला वाटते ?”
     मग मी विचार करू लागलो की बापू असे का म्हणाले असतील ? खरे तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण बापूंना मुले, सुना, नातवंडे सगळे आहेत. सुना म्हणजे त्यांच्या लेकीच आहेत. वडिलांच्या मायेने ते सुनांची विचारपूस करतात. मुख्य म्हणजे त्यांना फारसे प्रश्न विचारत नाहीत. घरातील त्यांच्या रोजच्या जीवनात कुठलीही ढवळाढवळ करीत नाहीत. त्यांनी काही विचारले तरच वडिलकीच्या नात्याने सल्ला देतात. त्यामुळे सुना सुद्धा त्यांना आदर, प्रेम देतात. काय हवे नको ते बघतात. संध्याकाळी कधी कधी बापू नातवंडाना फिरायला नेतात. त्यांच्यासाठी खाऊ आणतात. रोजच्या जेवणाबद्दल कधीही कुरकुर नसते. जे पुढ्यात आले ते आनंदाने खायचे असा त्यांचा शिरस्ता आहे. बापूंची मुले सुद्धा बापूंना आदराने वागवतात. खरेच सेवानिवृत्तीनंतर कसे जगावे याचा आदर्श बापूंनी घालुन दिला आहे असे मला वाटते. आणि हाच खरा वानप्रस्थाश्रम !
     मग तरी मला प्रश्न पडला की बापू देवाला अशी प्रार्थना का करत असावेत ? ते आजारी पडले तरी त्यांचे करायला मुले, सुना आहेत ना ? पण यावर त्यांचेच म्हणणे असे होते की, “ सर, अंथरुणाला खिळून हाल नको. एकदा का अंथरुणावर पडलो आणि सगळे विधी तिथेच व्हायला लागले की सगळेच कंटाळा करतात, टाळायला लागतात. ते बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या मनातून हा म्हातारा आता आणखी किती दिवस जगतो अशी भावना असते. असे परस्वाधीन आणि तिरस्कारयुक्त जगण्यापेक्षा मरण आलेले बरे. जोपर्यंत आपण स्वतः आपले स्वतःचे करू शकतो तोपर्यंतच जगणे चांगले.” खरच किती योग्य आणि वस्तुस्थितीला धरून आहे हे ..! जोपर्यंत आपण दुसऱ्याला हवेहवेसे वाटतो तोपर्यंतच जगणे चांगले.
     जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित असतो. पण तो कसा व्हावा ? जगण्याचा सोहळा व्हावा तसा मृत्यूचाही सोहळा व्हावा. जगणे जसे सुंदर तसाच मृत्यूही सुंदर असावा. नैसर्गिक असावा. झाडावरचे पिकले पान कसे सहजपणे गळून पडते ...! अगदी तसा असावा. पण जन्म आणि मृत्यू माणसाच्या हातात नाही. कसे जगावे हे मात्र आपल्या हातात असते. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगलाच होणार. काही माणसे अखेरच्या क्षणापर्यंत नियतीने आपल्या वाट्याला दिलेली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणाने बजावतात.
     एक उदाहरण देतो. गेल्या वर्षी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांचे निधन झाले. ते केवळ व्यंगचित्रकार होते असे नाही तर एक तळमळीचे आणि निस्वार्थपणे काम करणारे समाजसेवक सुद्धा होते. व्यंगचित्रांची त्यांनी दरवर्षी प्रदर्शने भरवली आणि त्यात नित्य नवीन व्यंगचित्रांची भर घातली. व्यंगचित्रांचे प्रदर्शन सुद्धा गर्दी खेचू शकते हे त्यांनी दाखवून दिले. ते उत्तम नाट्यसमीक्षक होते, साहित्याची जाण असणारे होते. वयाची सत्तरी पार केल्यानंतर सुद्धा त्यांनी आपले जनजागृतीचे कार्य थांबवले नाही. फटाके पर्यावरणाच्या दृष्टीने घातक प्रदूषण करणारे आहेत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतः त्यावरील पत्रके काढून पुण्याच्या नळ stop चौकात लोकांना वाटली. त्यात त्यांना कसलीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही. मी एवढा मोठा व्यंगचित्रकार आणि मी हे पत्रके वाटण्याचे काम कसे करू हे त्यांच्या मनातही आले नाही. हे एका कृतार्थ जीवनाचे आणि कर्मयोग्याचे उदाहरण आहे. अशी पुष्कळ उदाहरणे आपल्या अवतीभवती आढळतील. तुम्हालाही माहिती असतील. जे दुसऱ्यांच्या साठी उपयोगी पडते ते कृतार्थ जीवन होय. असे म्हणतात ना की जीवन हे एक पुस्तक आहे. यातील पहिले आणि शेवटचे पान विधात्याने लिहिलेले असते पण मधली पाने आपल्या कर्तृत्वाने आपल्याला भरायची असतात. ती अशी शेवटपर्यंत कार्यरत राहून भरावीत. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा शोक करू नये. गीतरामायणात ग.दि.माडगूळकर यांनी माणसाची पराधीनता फार सुंदर शब्दांत वर्णन केली आहे. माणसाच्या पराधीनतेचे आणि मृत्यूचे तत्वज्ञान सांगणारी यापेक्षा दुसरी सुंदर कविता नसावी. इतकी ती अर्थपूर्ण आहे. ऐकतांना डोळ्यांच्या कडा ओल्यावल्याशिवाय राहत नाहीत. राजा दशरथाचा जेव्हा मृत्यू होतो आणि भरताला कळते की वडिलांचा मृत्यू आणि श्रीरामाचा वनवास याला कारणीभूत आपली आई कैकयी आहे. तेव्हा तो श्रीरामाला परत आणण्यासाठी वनात जातो आणि रामाला परत येण्याची विनंती करतो. तेव्हा राम त्याला सांगतो, की भरता शोक करू नकोस. ‘ पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’ सुधीर फडकेंनी आपल्या मधुर आणि भावपूर्ण आवाजात ते गीत अमर केले आहे. जरूर ते गीत ऐका. मरावे परी कीर्तिरूपे उरावे ते असे. माझे वडीलही असेच अगदी अखेरपर्यंत कार्यरत होते.  या निमित्ताने त्यानाही वंदन करतो.
- विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

Comments

Popular posts from this blog